पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याभरात लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारकडून जीआरचा धडाका लावला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटोपण्याची राज्य सरकारला घाई झाली आहे. दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय तडीस लावले आहेत. जीआरमध्ये अनेक विकासकामांबद्दल निर्णय घेतले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, आणि त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसांत गतिमान पद्धतीने तब्बल २६९ शासन निर्णय जारी केले आहेत. राज्य सरकारकडून घेतलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयांचा समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटोपण्याची राज्य सरकारला घाई आहे. ७ मार्च रोजी १७३ शासन निर्णय, तर सहा मार्चला ९६ शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होतात. शिवाय ८, ९ आणि १० मार्चला सलग सुट्ट्यांचा विचार करून तातडीने ६ आणि ७ मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती मिळत आहे.
प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय, राज्य उत्पादन शुल्कासारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना, कोकणातील काही योजनांना मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय यांचा समावेश आहे. आता यामध्ये सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे. जीआरमध्ये अनेक विकासकामांबद्दल निर्णय घेतले आहेत.