पुणे : दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यभरातील ५९ हजार अंशत: अनुदानित शिक्षकांनी थेट दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. अनेक शाळांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. विशेष म्हणजे विभागीय शिक्षण मंडळात सोमवारी सायंकाळपर्यंत ५५० उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात हे प्रमाण अधिक आहे.
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची १ मार्चपासून परीक्षांना सुरुवात झाली आहे. असे असतानाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंशत: अनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. अनेक शिक्षकांनी तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत पाठवले आहेत. त्यामुळे आता दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना परत आल्यावर शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवले आहेत. ज्यात तपासणीविना उत्तरपत्रिका परत आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये उत्तरपत्रिका न तपासता परत पाठवणार आहेत, त्यांच्या महाविद्यालयाचा दहावी-बारावीचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंडळ मान्यताही रद्द करण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.
दरम्यान, बारावी आणि दहावीच्या परीक्षांना सुरवात झाली आहे. मात्र, याच परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपी सुरु असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जालना, बीड, लातूर जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवल्या जात आहेत. भिंतीवर चढून जीव धोक्यात घालून तरुण कॉपी पुरवत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाला सर्रासपणे केराची टोपली दाखवली जात आहे.