पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी खळबळजनक दावा केला आहे. “अजित पवार गटाच्या २२ आमदारांना शरद पवारांकडे परत यायचे आहे, तर १२ आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार म्हणाले की, दादांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही सांगितले होते की, लोकमत असलेल्या एका मोठ्या नेत्याला भाजपने राजकीयदृष्ट्या संपवलं आहे. भाजपची रणनितीच भ्रष्ट आहे. नेत्यांना, पक्षांना जवळ करणे आणि संपवून टाकणे. पण ते एवढ्या लवकर होईल हे माहीत नव्हते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना ९ जागा मिळतील, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु ९ ऐवजी आता त्यांना चारवरच आनंद साजरा करावा लागणार आहे.
जागावाटपावरून महायुतीमध्ये धुमश्चक्री होणार, हे नश्चित होते, असे सांगत रोहित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता. भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील बऱ्याच लोकांना बीजेपीच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे. अजित पवारांच्या पक्षातील बऱ्याच आमदारांना देखील भाजपच्या चिन्हावर लढायचे आहे. यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे. तर, २२ आमदारांना पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत यायचं आहे. त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार आणि यात शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षाचे नुकसान होणार.
लोकसभेची परिस्थिती पाहता विधानसभेत घड्याळावर कोणीच उभे राहणार नाही. सर्वच भाजपच्या पक्षाकडून उभे राहतील. त्यामुळे दादांचे १२ लोक आहेत, जे अजितदादांनी भाजपमध्ये जावे असे सांगत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
विजय शिवतारेंवर देखील रोहित पवारांनी तोफ डागली. मुद्दा हा आहे की, सत्तेत सोबत असणाऱ्या अजित पवारांबद्दल शिवतारे कसे बोलले. त्यांचे धाडस कसे झाले. अजित पवारांबद्दल त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला सांगितले, की भाजपच्या नेत्याने बोलायला लावले. की अन्य काही प्रयत्न होता?, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.