Big News | पुणे : ओला, उबेरमार्फत दिल्या जाणाऱ्या चारचाकी कॅब सेवेला हिरवा कंदील, तर रिक्षा सेवेला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या गुरुवारी (२० एप्रिल) झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला.
चारचाकी, तीनचाकी वाहनांमधून ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबरसह इतर कंपन्यांना ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी सहा मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे. त्यानंतर २० एप्रिलपर्यंत ‘ऍग्रीगेटर’ परवान्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकाराला दिले होते.
त्यानुसार पुण्यासह राज्यातील विविध शहरांत ऑनलाइन प्रवासी सेवा देण्यासाठी आणि ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी ओला, उबरसह इतर कंपन्यांनी अर्ज केले होते.
पुणे ‘आरटीओ’कडे ओला, उबेर, रॅपीडोसह शहरातील एका कंपनीने अर्ज केला होता. यामध्ये ओला व उबरने तीन चाकी व चारचाकीसाठी अर्ज केला आहे, तर इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. त्यामध्ये ओला, उबेरच्या हलक्या कारद्वारे प्रवासी सेवेला परवाना देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
दरम्यान, रिक्षा सेवेसाठीच्या चारही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे ओला, उबेरकडून शहरात सध्या दिली जाणारी प्रवासी सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे.