Big News : पुणे : जी २० शिखर परिषदेच्या संमेलनावेळी होणाऱ्या विविध देशांतील प्रमुखांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरसाठी बोलावले आहे. जी २० तील देशांना मुर्मू यांनी भारतातर्फे निमंत्रण पत्र पाठवले आहे. यात त्यांच्या कार्यालयाने प्रेसिडेंट ऑफ इंडिया असे न लिहिता, प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले आहे. एका सरकारी बुकलेटमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव भारत के प्रधानमंत्री असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान जे विशेष अधिवेशन बोलवण्यात येत आहे, त्यात वन नेशन, वन इलेक्शनसह देशाचे नाव बदलून इंडियाऐवजी अधिकृतपणे भारत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रेसिडेंट ऑफ इंडिया असे न लिहिता, प्रेसिडेंट ऑफ भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी एशियन इंडिया परिषदेसाठी आज इंडोनेशिया येथे जाणार आहेत. याठिकाणी सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. एशियन अर्थात दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनांचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत. पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” असा करण्यात आला आहे. खुद्द भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे.
मात्र, काँग्रेससह इतर विरोधकांनीही याला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसने दोन फोटो ट्विट करत म्हटलंय आहे की, इंडिया को मिटाना नामुमकिन है. संविधानाची प्रत ट्विट करत इंडिया नाव मिटवण्याचा प्रयत्न होतो, असे दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, जब सामने इंडिया हो तो बडे बडे भाग जाते है. अर्थात या ट्विटमध्ये काँग्रेसने विरोधकांच्या इंडिया आघाडीचा दाखला दिला आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडीच्या विरोधात, देशभरातल्या २८ विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. जुडेगा भारत… जितेगा इंडिया, अशी घोषणा देत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा मुंबईत नुकताच शंखनादही झाला. त्यामुळे इंडिया आघाडीला घाबरुनच, इंडिया नाव बदलत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे.
केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असले तरी, त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रपतींच्या राजपत्रामधून ‘इंडिया’ हा शब्द गायब होऊन ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधानदुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नामकरण ‘इंडिया’ झाल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, ‘इंडिया’ नाव घेतल्याने सत्ता मिळत नसते, विरोधकांची महाआघाडी ‘घमंडिया’ असल्याची टीका केली होती. त्यानंतर संविधानातील ‘इंडिया’ हा उल्लेख वगळण्यासंदर्भातील चर्चेला बळ मिळाले.