पुणे : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोड घडण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे आज दुपारी चार वाजता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील चार दिवसांपासून सुरु होती. खुद्द शरद पवार यांनीच ही अफवा असल्याचे सांगत या चर्चांवर पडदा टाकला होता. यामुळे चर्चा शांत होत असतानाच पुन्हा लंके यांच्या शरद पवार गटात पक्षप्रवेशाची बातमी आली आहे. आता निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. मागील अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु होत्या. आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. दरम्यान, काल भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलल जात आहे. आज या प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.