पुणे : निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची घोषणा केली. आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ हे दिले आहे. यामुळे आता शरद पवार गटाला नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी आज ४ नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत. निवडणूक आयोगाने तशी सूचना शरद पवार यांना दिली आहे. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी (ता. ७) दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष आणि चिन्हांची नावे समोर आली आहेत.
पक्षाचे नाव : शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष
चिन्ह : कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य
दरम्यान, अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाले, त्याचा मान राखा, असे अजित पवार म्हणाले. याशिवाय जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा, पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद करू नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव सांगण्यासाठी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष शिथिलता देत, आयोगाने तीन पर्याय देण्यासाठी बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे.