पुणे : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या हुक्क्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. कोंढवा पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीत मिळत आहे.
बाकिर रमेश बागवे (वय ३६, रा. भवानी पेठ), हरुन नबी शेख (वय २५, रा. नोदीया, पश्चिम बंगाल), बिक्रम साधन शेख (वय २०,पश्चिम बंगाल), अमानत अन्वर मंडळ (वय २२, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून गुन्हा दाखल करण्यात आलेले बाकिर रमेश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीतील बेकायदा व अवैध धंद्यांची माहिती घेत त्यावर कारवाई करीत होते. या मोहिमेदरम्यान गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेड़िस्कर हे रात्रगस्तीवर होते. त्यावेळी, खबऱ्यामार्फत पोलिसांना एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या ‘द व्हीलेज हॉटेल’मध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला आहे.
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ‘द व्हिलेज हॉटेल’चे चालक ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवित असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखुजन्य हुक्क्याचे फ्लेवर, ९ काचेचे हुक्क्याचे पॉट, व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच, या सर्वांवर कोंढवा पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ), २१(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.