Big News : पुणे : मराठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. अद्यापही मागण्या मान्य न झाल्याने जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. आरक्षणातील मागण्यांसंदर्भात आदेश न निघाल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. आजपासून जरांगे पाटील यांनी औषधे आणि पाणीही त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांची एक महाबैठक मुंबई येथे आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण तसेच ओबीसींच्या भूमिकेवरही चर्चा होणार आहे. विविध पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून, आरक्षणावर तोडगा काढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
सरकारची कसोटी लागणार
दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून, काही ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Big News) मात्र, या वेळी झालेली चर्चा देखील निष्फळ ठरल्यास निर्णय घेताना सरकारची कसोटी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तीन बैठका झाल्या. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्या ११ जणांच्या शिष्टमंडळासोबत अडीच तास बैठक झाली. त्यात सात निर्णय घेण्यात आले. पण एकाही निर्णयाचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. (Big News) समित्यांना अहवाल देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पण अधिकाऱ्यांना बडतर्फ करायला आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायलाही समितीच लागते का? असा सवाल आंदोलक करत आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत मी शब्दाला जागलो. पण सरकार शब्दाला जागत नाही. आम्ही जी मागणी केली ती पूर्ण होत नाही. (Big News) मराठा समाजाला सरसकट आरक्षण आदेश काढत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावेत, अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, ही आमची मागणी आहे.