पुणे : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच आता पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. अनेक वर्षांपासून असणारं राजकीय वैर बाजूला सारून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे फेस्टीव्हलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हस्ते उद्धाटन होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात 15 वर्षं एकत्र सत्ता असतानाही पुण्यात मात्र काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले आहेत.
एकमेकांना शह देण्यासाठी या दोघा नेत्यांनी स्थानिक पातळीवर कधी भाजप तर कधी शिवसेनेसोबत आघाड्या केल्या होत्या. या संघर्षातून पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कधीच कलमाडींनी सुरू केलेल्या पुणे फेस्टीव्हलच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. मात्र आता 36 व्या पुणे फेस्टीव्हलच्या उद्घाटनाला अजित पवार सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा पुणे फेस्टीव्हलकडे लागून राहिल्या आहेत.
सुरेश कलमाडींकडून पुणे फेस्टिवलची सुरुवात..
माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्यात या पुणे फेस्टिवलची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून अजित पवार आजपर्यंत या कार्यक्रमात कधी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे यंदा पुणे फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याने सुरेश कलमाडी आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, सुरेश कलमाडी हे प्रकृती ठीक नसल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही याबद्दल अद्यापही माहिती उघड झालेली नाही.
पुणे फेस्टीव्हलचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते..
पुणे फेस्टिव्हल’ची 36व्या पुणे फेस्टीव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (13 सप्टेंबर) दुपारी 4:30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज यांचीही उपस्थिती राहणार आहे.