बारामती : बारामतीमधून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, सभा घेत आहेत, त्यावेळी बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागणार आहे. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा हा युगेंद्र पवार यांना असून एक नवीन नेतृत्व आहे, त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे.” असं बारामती दौऱ्यावेळी शरद पवार म्हणाले.
.. तर भक्कमपणे युगेंद्र प्रश्न सोडवेल : शरद पवार
शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता टीका केली आहे. ‘काही लोकं सांगतात, मी लोकांना सांगेल भावनेने आवाहन करेल, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. सुप्रिया सुळे यांना 48 हजार मते जास्त दिली, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया. मला आता आमदारकी नको , खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र इथले प्रश्न सोडवेल, असं देखील देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
..तर पंतप्रधान कशाला होता?
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतं आहे ते राज्याच्या हिताचं नक्कीच नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदल्लयाला हवी. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोण चांगला राहतो. दुर्दैवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत, अशी टीका शरद पवारांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर केली.