पुणे : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होत आहेत, नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तसेच जागावाटपानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुद्धा रंगत आहे. अशातच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी गेले काही दिसावं झाले चांगलाच जोर पकडलेला आहे. त्या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. मात्र आज पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा पुढे आली आहे. त्याचमागील कारण म्हणजे सोशल मिडियावरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एक फोटो सद्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या या फोटोवरती ‘नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी’ असं लिहण्यात आलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील येणार अशा पद्धतीचे सध्या सोशल मीडियात पोस्टर व्हायरल होत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असं काही नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
व्हायरल फोटोबाबत हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘याआधी देखील असे बॅनर व्हायरल झाले आहेत. परंतु आम्ही आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचे वाटप झालेलं नाही. आम्ही वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडं लक्ष ठेवून आहोत. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पितृ पक्ष पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत? जाणून घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.