पुणे : सहकार क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. सहकार विभाग राज्यातील २१ कारखान्यांना ‘एनसीडीसी’मार्फत थकहमी कर्ज देण्याच्या प्रयत्नात आहे. एकूण २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. या कर्ज योजनेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर येथील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ‘घोडगंगा’ कारखान्याची दारे पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील काही कारखान्यांना वाचवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे. सहकारी कारखान्यांना एनसीडीसीमार्फत थकहमी कर्ज देण्यात येणार आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमनसोबत बैठक पार पडली. सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार आहे. एकूण २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. या यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.
अन्य साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरु असताना शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना मात्र बंद आहे. त्याच्या निषेधार्थ अनेक मोर्चा निघाले, आंदोलने झाली. मात्र, कारखाना सुरू झालेला नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येथील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी, कारखाना सुरू करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘घोडगंगा’ला थकहमी कर्ज मिळाल्यास कारखाना नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कारखानदारांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे पाटील, अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. उद्या पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
कोणत्या कारखान्यांना मिळणार कर्ज…
– सुंदरराव सोळूखे सहकारी साखर कारखाना बीड
– संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
– वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी, अहमदनगर
– लोकनेते मारुतीराव घुले सहकारी साखर कारखाना, नेवासा
– किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई
– क्रांतीविर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना वाळवा, सांगली
– किसन वीर सहकारी साखर उद्योग खंडाळा, सातारा
– अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर, अकोले
– कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट
– मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, नेवासा
– शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
– शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव
– तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
– रावसाहेब पवार घोडगांगा सहकारी साखर कारखाना, शिरूर
– राजगड सहकारी साखर कारखाना, भोर
– विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, मुरूम–भाजपा बसवराज पाटील