लोणी काळभोर, ता. 2 : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत शहरीकरण, नागरीकरण व औद्योगिकीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी आपत्ती आणि आगीच्या छोट्या-मोठ्या घटना वारंवार घडत आहेत. हडपसर आणि वाघोली येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत नागरिकांचे मोठे नुकसान होते. यामुळे पूर्व हवेलीत आग लागून होणारे नुकसान टाळण्यासाठी पुणे प्राईम न्यूजने वारंवार आवाज उठविला होता. याची दखल घेऊन व जनमताचा रेटा पाहून प्रशासनाने लोणी काळभोर, केडगावसह जिल्ह्यात या 10 ठिकाणी अग्निशामक केंद्र मंजूर केले आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या सुरक्षिततेसाठी दहा ठिकाणी अग्निशामक केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. या केंद्रांसाठी जागा निश्चित होत नव्हत्या, मात्र आत जागा निश्चितीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. तसेच जागा निश्चितीसाठी ‘पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास लक्षात घेऊन दहा अग्निशामक केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्र बांधण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे. त्यामध्ये अग्निशमन दलाची केंद्रे हे लोणी काळभोर, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी (हवेली), शिक्रापूर (शिरूर), केडगाव (दौंड), कान्हे (मावळ), दिवे (पुरंदर), पाटण (मावळ), महाळुंगे (मुळशी), येवलेवाडी (खेड) येथे होणार आहेत.
दौंड, खेड, मुळशी, शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. तर सर्वाधिक जास्त केंद्रे हे हवेलीमध्ये तीन आणि मावळ तालुक्यात दोन होणार आहेत. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये 814 गावांचा समावेश आहे. औद्योगिक वसाहती, त्यामुळे वाढत्या नागरीकीकरणामुळे अग्निशमन केंद्रांची अत्यंत आवश्यकता होती. सध्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेसाठी प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तातडीने केंद्रांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या कामांसाठी दीडशे कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एखादी मोठी दुर्घटना घडली, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अग्निशामक विभागाच्या गाड्या बोलवाव्या लागतात. त्यासाठी ग्रामीण भागात जागा निश्चित करून त्या मिळवण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे प्रयत्न सुरू आहेत.