विशाल कदम
पुणे, ता.२२: हवेली तालुक्यात वेगवेगळ्या तलाठी व सर्कलचे रोज नवनवीन कारनामे उघड होत आहेत. लोणी काळभोर येथील प्रोटोकॉलच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या फेरफार नामंजूर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क शेतकऱ्याची जमीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे.
तालुक्यातील डोणजे येथे शेतकऱ्याचे नाव तलाठी व सर्कलच्या चुकीमुळे सातबारातून गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या चुकीमुळे महसूली यातना संबंधित शेतकरी भोगत आहे. आर्थिक खर्च होऊनही तलाठी व तहसील कार्यालयात खेटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सन २०१९ मध्ये तहसील कार्यालयात ७/१२दुरुस्तीचा अर्ज देऊन, त्या अर्जावर २०२२ साली तलाठी कार्यालयाचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल होऊनही सातबारावर नाव दाखल करण्याचा आदेश अद्याप झालेला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘चुका तलाठी व सर्कलच्या, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना’ अशी सातबारा दुरुस्तीची हवेलीत अवस्था बनली आहे. दोन तहसीलदाराच्या कारभारानतंर (सुनील कोळी,तृप्ती कोलते) हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे या शेतकऱ्याला १५५ चा आदेश देऊन न्याय देणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
“चुका तलाठ्यांच्या, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना” असा प्रकार म्हणजे सातबारांमधील चुक दुरुस्तीच्या १५५ ची व्याखा बनत चालली आहे. सातबारांमधील चुक दुरुस्तीसाठी अर्ज करुन एक दोन वर्षांनंतरही दुरुस्ती होत नसेल, तर ही हवेली महसूल प्रशासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट झाली आहे. यासाठी जाणूनबुजून विलंब करण्यास जबाबदार असलेल्या कर्मचारी वर्गाची चौकशी करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी दाखवणार का? असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहेत.
याबाबत शेतकरी सुनील पायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे डोणजे येथील गट नंबर ३४३ या सातबारावरील नावच गायब झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये तहसील कार्यालयात १५५ अन्वये अर्ज दाखल केला. दरम्यान तलाठी कार्यालयाने त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात पाठवला असून हनो/कावि/२८२३/ २१/०४/२०२२ अन्वये तो १५५ एसआरकडे वर्ग झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यावर अजूनही आदेश न झाल्याने प्रशासनाचा टोलवाटोलवीचा व विलंबाचा कारभार पुढे आला आहे.
सुनील सोपानराव पायगुडे यांनी डोणजे ता.हवेली येथील गट नंबर ३४३ मधील २.५ गुंठे क्षेत्र खरेदी केले. त्याची गावी फेरफार क्रमांक १४३० अन्वये हस्तलिखित सातबारावर नोंद झाली. हस्तलिखित सातबारा २०१६ मध्ये ऑनलाईन सातबारा झाला. त्यानुसार ऑनलाईन सातबारावर पायगुडे यांचे नाव होते. मात्र, अचानक त्यांनी कोणताही मिळकत हस्तांतरणीचा व्यवहार न करताही त्यांचे नाव ७/१२ वरुन गायब झाले. यामध्ये शेतकऱ्याची कोणतीच चूक नाही व नव्हती. आजही सातबारावर फक्त फेरफार क्रमांक १४३० ची नोंद आहे. मात्र, शेतकरी पायगुडे यांचे नाव गायब असल्याने त्यांची तहसील कार्यालयातील हेलपाट्यांची मालिका अजून संपलेली नाही.
दरम्यान, याबाबत हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा विषय महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्याकडे असल्याने मला त्याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही. त्यानंतर महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
डोणजे येथील गट नंबर ३४३ वरील माझे नाव तलाठ्यांच्या चुकीने गायब झाले आहे. हस्तलिखीत सातबारा पुस्तक संपले. नतंर पुनर्लेखन करताना माझा फेरफार घेतला गेला, मात्र माझे नावच सातबाराला घेतले नाही. यामध्ये माझी चूक काय? यासाठी मी २०१९ व २०२२ असे दोनदा अर्ज तहसील कार्यालयात केले. त्यावर तलाठ्यांनीही अहवाल दिला. मात्र दहा ते पंधरा दिवसांनी या, हे ठरलेले उत्तर तहसील कार्यालयातून कायम मिळत आहे. महसूल सहायक,अव्वल कारकून, महसूल नायब तहसीलदार व तहसीलदार यांचीही बदली होऊन गेली आहे. परंतु, अजूनही माझा आदेश झालेला नसल्याने हवेली तहसील कार्यालयातील कारभाराचा वाईट अनुभव येत आहे.
सुनील पायगुडे (शेतकरी -डोणजे ता. हवेली)
“पुणे प्राईम न्यूज चे नागरिकांना आवाहन “
नागरिकांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही, सर्व शासकीय अधिकारी हे लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून कामात तुमची अडवणूक होतेय, प्रोटोकॉलसाठी प्रकरण वेठीस ठेवले जाते, खेटे मारावे लागतात, चला तर मग आपली समस्या निर्भिडपणे पुणे प्राईम न्यूजला कळवा. आम्ही आपले नाव गुप्त ठेवून आपल्या समस्येला प्रकाशित करुन प्रशासन व जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करु. आपली समस्या puneprimenews@gmail.com. या ई मेल आयडीवर कळवू शकता. तसेच तक्रारदारांनी मेल करताना आपला मोबाईल क्रमांक अवश्य नमूद करावा.
जनार्दन दांडगे (मुख्य संपादक- दै.पुणे प्राईम न्यूज)