पुणे : देशात नाव चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांनी दोन वेळा समन्स बजावूनही वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांनी प्रतिसाद दिला नव्हता. तसेच त्या वाशिम येथून नागपूरला गेल्या होत्या. त्यानंतर त्या मसुरीला जाणार, की पुण्यात येणार? याची चर्चा होती. अखेर त्यांनी पुणे पोलिसांच्या दुसऱ्या समन्सला प्रतिसाद दिला असून आपण स्वतः जबाब देण्यास उपस्थित राहणार असल्याचा निरोप सुद्धा दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर पुणे पोलिसांसमोर हजर होणार हे स्पष्ट झाले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. वाशिम पोलिसांनी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पुणे पोलीस करत आहेत. या प्रकरणात पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदविण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले होते.
सोमवारी जबाब नोंदवला जाण्याची शक्यता !
आपण इकडे-तिकडे जबाब देण्यापेक्षा पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये येऊन जबाब देण्यास तयार असल्याचे पूजा खेडकर यांनी पुणे पोलिसांना सांगितले. मात्र, शनिवार आणि रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात असल्याने सर्व पोलीस अधिकारी बंदोबस्तात आहेत. यामुळे खेडकर यांचा जबाब सोमवारी नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्या सध्या पुण्यात आहेत, की इतरत्र कोठे हे समजू शकलेले नाही. त्या पुण्यातील घरी आल्या नसल्याची माहिती समोर येत आहे.