पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाचा तिढा गंभीर बनत आहे. त्यातच आता मित्रपक्षदेखील थेट भूमिका घेताना दिसत आहेत. महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत, मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केलेली आहे. शरद पवारांनी एक जागा देण्याचं मान्य केलं आहे. आमचं बोलणं सुरु आहे, जोपर्यंत आमचं गणित बसत नाही. तोपर्यंत वाट पाहू, नाही तर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही… असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केले आहे.
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत जानकर यांना एक जागा देण्याचे आश्वासन देखील दिल्याची माहिती जानकर यांच्याकडून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना जानकर म्हणाले की, माढा माझा होम पीच आहे. परभणीत माझा आमदार निवडून आला आहे. परभणीला मी मागील ३० वर्षांपासून भेट देत आहे. याच परभणीने मला पहिला जिल्हा परिषद सदस्य दिला होता. त्यामुळे परभणीवर माझा डोळा आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा जसा विकास झाला त्याप्रमाणे परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा देखील विकास करायचा असेल, तर मला परभणीकरांनी एक संधी द्यावी, असे जानकर म्हणाले.
महाविकास आघाडीत आम्हाला तीन जागा देण्यात यावेत अशी मागणी मी शरद पवारांकडे केली आहे. ज्यात परभणी, माढा आणि सांगली या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, शरद पवारांनी एक जागा देण्याचे सांगितले आहे. शरद पवारांचे यामुळे अभिनंदन करतो. मात्र, महाविकास आघाडीने आम्हाला विचारले नाही असेही जानकर म्हणाले.