इंदापूर : इंदापूर शहरालगतच्या बायपास रोडवरील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा १६ मार्च रोजी गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. दोन गुन्हेगार टोळीतील पुर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे. तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुणे-कोल्हापूर हायवेवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे.
अविनाश धनवे (वय ३१, रा. चऱ्होली बुरा, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत अविनाश धनवे याची पत्नी पूजा अविनाश धनवे हिने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
संबंधित गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, संजय जाधव (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती विभाग), स्वप्निल जाधव (दौंड विभाग) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकांसह व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादींकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पुर्ववैमन्यसातून झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृत अविनाश बाळू धनवे याची चन्होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीनेच केल्याची माहिती मिळाली आहे. गुन्ह्यातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५ वर्षे, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे), मयूर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २० वर्षे, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकीसमोर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४, चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची, ता. खेड, जि पुणे), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड, जि. पुणे) यांना पुणे-कोल्हापूर हायवेवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयातील इतर आरोपींचा शोध चालू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.