पुणे : पुण्यात एका डेअरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री 12 च्या सुमाराच्या सुखसागर नगर येथे किसान डेअरी नावाच्या दुकानात घडली. या घटनेत दुकानात आत झोपलेल्या मालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
रामदास साळुंके (वय-65) असे मृत मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मालक रामदास साळुंके हे डेअरमध्ये झोपले होते. त्या रात्री अचानक डेअरीला आग लागली. दुकानात आग लागल्याची घटना घडताच स्थानिक नागरिक मदतीसाठी तेथे पोहोचले. त्यावेळी स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, दुकानाचे कुलूप तोडून, आग विझवून दुकानदारापर्यंत मदत पोहोचवेपर्यंत खूप उशीर झाला. दरवाजाचे कुलूप तोडून आग विझवण्यात आली, परंतु त्याचवेळी डेअरीचे मालक आतमध्ये आगीत गंभीररित्या भाजले गेले होते. त्यांना स्थानिकांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी दुकान मालकाला मृत घोषित केलं.
दरम्यान, किसान डेअरीचे मालक रोज रात्री कुलूप लावून दुकानाच्या आतमध्ये झोपायचे, असं उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलं.