पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी (ता. २३) अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी मोठी मागणी केली आहे. नाशिक जिल्हा हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी आग्रही असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. यामुळे महायुतीच्या इच्छुकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेसाठी आग्रही असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीनंतर मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मनसेकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकच्या महायुतीच्या इच्छुकांची चिंता वाढली आहे. आता ही जागा मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट की शिवसेना शिंदे गटाला मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या बैठकीत साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला गेला आहे. उदयनराजे भोसले भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपची कोंडी झाली आहे.