पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. शहरातील मतदानाची घटती आकडेवारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. हे टाळण्यासाठी शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्याठिकाणी मतदान करण्यासाठी जावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घेतलेल्या या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात १ लाख ७५ हजार मतदारसंख्या
पुण्यात एक लाख ७५ हजार मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर करण्यात आली. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही १६ एप्रिल ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यामुळे १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.