पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे यांच्या पदयात्रेला पुणेकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. पुण्यात एका दिवसासाठी विसावलेले भगवे वादळ पाहूनच मुंबईतील धडकी भरवणाऱ्या आंदोलनाची कल्पना आली. आज हे वादळ लोणावळा येथे पोहचले आहेत. त्यानंतर जरांगे हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत मुंबई गाठणार असे नियोजन होते. मात्र, जरांगे यांची रॅली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहचण्यापूर्वीच पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात केली आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परवानगी दिली जाणार नसल्याच्या चर्चेला वेग आला आहे. पोलिसांनी नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे आता जरांगे यांची आरक्षण रॅली कोणत्या मार्गाने जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड हे जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळा येथे पोहचले आहेत. एका बंद खोलीत विभागीय आयुक्त आणि जरांगे यांच्यात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.