पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुणे ते सोलापूर मार्गावर दहा ‘ई- शिवाई’ सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ‘ई-शिवाई’च्या माध्यमातून चार शहरांना जोडले जाणारे पुणे हे एसटीचे एकमेव केंद्र बनले आहे. पुण्यातून चार शहरांसाठी ५० ‘शिवाई’ धावत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे दरम्यान रविवारपासून १० ‘ई-शिवाई’ची सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसच्या दिवसभरात २० फेऱ्या होणार आहेत. पुण्याहून सोलापूरसाठी पहाटे पाच वाजता पहिली ‘ई-शिवाई’ स्वारगेट येथून सुटेल. त्यानंतर एका तासाने ई-बस सुटतील. सोलापूरहून पुण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता पहिली बस असेल. त्यानंतर सकाळच्या टप्प्यात एका तासाने बस सुटतील.
पुणे ते नगर मार्गावर राज्यातील पहिली ‘शिवाई’ धावली होती. त्यानंतर एसटीने पाच हजार ‘शिवाई’ बस घेतल्या. या प्रयोगाच्या यशानंतर एसटीच्या वेगवेगळ्या विभागांना ‘शिवाई’ देण्यात येत आहेत. पुण्यातून दुसरी ‘शिवाई’ छत्रपती संभाजीनगरला सुरू करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरसाठी शिवाजीनगर येथून पाच ‘ई-शिवाई’ धावतात.
दरम्यान, सध्या पुण्यातून मुंबईसाठी ४० ‘ई-शिवनेरी’ दादर आणि ठाणे मार्गावर धावत आहेत. स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून या बस मुंबईसाठी धावतात. या बसलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.