पुणे : एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदच्चंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्ती करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे आज (ता. २४) झालेल्या बैठकीत त्यांनी जाहीर केले आहे. १२ एप्रिल रोजी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या वेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, गावागावात सर्व कार्यकर्त्यांना जाऊन सांगा विजय शिवतारे ही निवडणूक लढणार आहेत. १ एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर या लढाईचा बिगुल वाजवायचा आहे. पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एक एप्रिलच्या बैठकीला निमंत्रण देणार आहे. तसेच ही लढाई मला लढू द्या, अशी विनंतीही त्यांनी शिंदे-फडणवीसांना केली.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी असे म्हणत १ तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि १२ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही शिवतारेंनी केली आहे.