पुणे : ऐन निवडणुकीत पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. व्याजाने पैसे देऊन अनेकांची पिळवणूक केल्याबद्दल नानासाहेब गायकवाडसह त्याची पत्नी नंदा गायकवाड आणि मुलगा गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाडच्या कंपनीचा प्रमुख प्रकाश कुलकर्णीच्या विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गायकवाड हा तीन वेळा मोक्का लागणारा गुन्हेगार ठरला आहे.
मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांनी याआधीच दोन वेळा मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) दाखल केलेला आहे. तरीही गायकवाडचे काळे धंदे थांबत नसल्याने पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारीचा टोळीप्रमुख नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड याच्यावर पोलिसांनी तिसऱ्यांदा मोक्का दाखल केला आहे. पुणे शहर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या तिसऱ्या मोक्का कारवाईला परवानगी दिली. चतुश्रुंगी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता.
गायकवाड याने संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असून, सदर टोळीने मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भिती घालून बलाद्ग्रहण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. गैरवाजवी आर्थिक फायदा, टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी त्याने सातत्याने गुन्हे केले आहेत.
दरम्यान, औंधमधील एनएसजी आय.टी. पार्क, सर्जा हॉटेल लेन येथील स्वतःच्या मालकीची नवीन इमारत नानासाहेब गायकवाड याने पूर्णत्वाच्या दाखल्यासह भोगवटापत्र मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात पुणे महानगरपालिकेकडे अर्ज न करताच परस्पर स्टेट बँक ऑफ इंडियाला व्यावसायिक वापरासाठी दिली होती. या जागेचा वापर थांबविण्याची कायदेशीर कारवाईची नोटीस महापालिकेने गायकवाडला दिली होती. त्यानंतर महापालिकेने या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिसांकडे गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुढे पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिसांकडे पाठवला होता.
दरम्यान, यासंदर्भात नानासाहेब गायकवाड याचा प्रस्ताव व त्यासोबत सादर केलेल्या पुराव्याचे, कागदपत्रांचे अवलोकन व छानणी केली असता या गुन्ह्यामध्ये नानासाहेब गायकवाड त्याचा व्यावसायिक भागीदार प्रकाश कुलकर्णी, नंदा नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड व इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.