पुणे : पुणे शहर व परिसरात काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली.
या कारवाईमध्ये ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणावर एमडी हा ड्रग पुण्यामध्ये येणार आहे. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास ४ कोटी रूपयांचे २ किलो एमडी जप्त केले आहे.
या कारवाईनंतर पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का, याचाही तपास सुरू आहे. यापूर्वी ललित पाटीलकडून वेगवेगळे ड्रग्स आणले जात होते. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. त्यानंतरही अशा प्रकारे ड्रग्स आणले जात होते, त्यापैकी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस तपास करत आहेत.