पिंपरी : पिंपरीजवळील मोरवाडी येथील मोकळ्या जागेतील भंगार मालाला २१ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. या आगीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचविल्याबद्दल पुण्यातील अमृतेश्वर ट्रस्टला महापालिकेचे वतीने दहा लाख दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
मोरवाडीतील पिंपरी न्यायालयाजवळ अमृतेश्वर कॉलनी आहे. तर पुण्यात अमृतेश्वर ट्रस्टचे कार्यालय आहे. कॉलनी शेजारी ट्रस्टची मोकळी जागा आहे. या जागेत मोठ्या प्रमाणावर भंगाराचे साहित्य होते. त्याठिकाणी २१ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी आग लागली. त्यानंतर पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे येथील अग्निशामक दलाचे १० बंब तसेच खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटचे ६ असे एकूण १६ बंब दाखल झाले. सलग दोन ते तीन दिवस ही आग धुमसत होती. तसेच ६० कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.
या घटनेमुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रबर, प्लास्टिकचे ड्रम, टायर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. पर्यावरणास हानी पोहोचविणे आणि प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण १९८६ च्या तरतुदीनुसार ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने पुण्यातील जंगली महाराज रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन नोटीस देण्यात आली. दहा लाख दंड केला आहे. दंड तातडीने भरावा, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.