पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांवर कार्यवाही सुरू झाली आहे. बेकायदा ड्रग्ज विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीला आणल्यानंतर पोलिसांनी गावी दारूभट्ट्या, अड्ड्यांवर कारवाई सुरू केली आहे. दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गेल्या दोन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटी ८१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ गुन्ह्यांची नोंद केली, तसेच ४११ आरोपींना अटक केली. या कामगिरीबद्दल राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाचे कौतुक होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने केलेल्या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर, १ हजार ८२३ लिटर ताडी, ३६ वाहने असा दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराइतांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीबाबत बंधपत्र घेण्यात आले आहे. बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले आहे.
दरम्यान, एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध, तसेच बेकायदा मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी ४६८ आरोपीना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले.
याबाबत उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही, अशा आरोपींविरुद्ध एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल ४८ प्रकरणांत पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून १० आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.