पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी भागात सराइतांकडून चार पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त केली. अविनाश पोपट मोरे (वय-३०, रा. मुख्य बाजारपेठ, शिरवळ) आणि क्षितीज भाऊसाहेब भोसले (वय- २०, रा. खंडाळा, जि. सातारा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून गस्त घालण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणाऱ्या गुंडाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुलटेकडीपासून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अविनाश मोरे आणि क्षितीज भोसले यांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश नेवसे यांनी केली.