पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मतदानाच्या पुर्वसंध्येला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. पर्वती मतदारसंघातील काही भागात भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे चित्रीकरण केले आहे. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १९) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन
पर्वती मतदारसंघातील बिबवेवाडी परिसरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले. याप्रकरणी संबंधित भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अश्विनी कदम तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.