पुणे : राज्याच्या राजकारणातील मुरब्बी नेता म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. तसेच अनुभवी नेता मनून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी पक्ष बांधणीवर चांगलच लक्ष केंद्रीत केले आहे.
अलीकडे शरद पवार यांच्या पक्षात अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांचाही समावेश आहे. शरद पवार यांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर यांना सोबत घेतले आहे. भूषणसिंह होळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भूषण सिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील. तसेच भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे, अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले होते. मध्यंतरी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता.
त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता. तेव्हा भूषणसिंह यांनी, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एका विरोधकाला स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे.