पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. तसेच एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जात आहे. अशातच आता एका सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षाच्या अपंगत्वावर टीका केल्याने हवेली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सह राज्य प्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सतिश हरीभाऊ नागवडे (वय ३६, रा. बाबुळसर, ता. शिरुर) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सहराज्य प्रमुख मोहसीन आझाद शेख (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड), योगेश सावंत (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सतिश नागवडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरुर तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या गटाचे सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे (रा़ न्हावरा, ता. शिरुर) हे आहेत. सुदर्शन जगदाळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप त्यांच्या बॅकग्राऊंडला सुदर्शन जगदाळे आणि सुहास मेटे यांचे फोटो टाकून त्यामध्ये ‘ही आपली लायकी’ तसेच ‘पक्ष चोरणार्यांचा सोशल मीडिया’ असा मजकूर लिहिलले आहे. ही ऑडिओ क्लिप मोहसीन शेख यांनी त्यांच्या फेसबुक वरुन व्हायरल केली आली. या ऑडिओ क्लिपमध्ये सुदर्शन जगदाळे यांचे अपंगत्वाबद्दल बोलून त्यांना समाजामध्ये अपमानीत करण्यात आल्याच दिसत आहे.
मोहसीन शेख हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सहराज्य प्रमुख सोशल मीडिया पदावर आहेत. त्यांनी आपल्या घरातून ही ऑडिओ क्लिप प्रसारित करुन जगदाळे यांची समाजात बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच योगेश सावंत यांनी देखील फेसबुक अकाऊंटवर व्हायरल करुन जगदाळे यांची बदनामी केली आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.