तुषार सणस
Bhor News : भोर : संपूर्ण राज्यामध्ये मोदी लाट असताना पुणे जिल्ह्यातून मोठ्या मताधिक्याने काँग्रेसकडून निवडून येणारे एकमेव हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांचे नाव पुढे येते ते संग्राम थोपटे यांचे. असे असताना वारंवार त्यांना काँग्रेस पक्ष हुलकावणी देत आहे. भोर तालुक्याला लाल दिवा मिळेल, या आशेने सर्व मतदार विरोधी पक्षनेते पद निवडीकडे लक्ष ठेवून होते. परंतु विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची निवड होताच भोर तालुक्यातून नाराजीचा सूर बाहेर येत आहेत.
भोर तालुक्यातून नाराजीचा सूर
थोपटे यांना विरोधी पक्ष नेते पदासाठी संधी द्यावी, असे राज्यातील काँग्रेसचे 30 आमदारांनी पक्षश्रेष्ठींना कळविले असताना त्यांना वळसा घालत वडेट्टीवार यांची निवड झाली. (Bhor News) थोपटे यांना यापूर्वी कधीही मंत्रीपद किंवा विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाले नव्हते. यावेळी तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल असे वाटत होते. मात्र, ते न मिळाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी नाराज झाले आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अनंतराव थोपटे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम थोपटे हे स्वतः तीन वेळा आमदार आहेत. पुणे शहरातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना निवडून आणण्यात थोपटे यांनी शर्तीचे प्रयत्न करत मोठ्या मतांनी धंगेकर निवडून आले होते.
तसेच कर्नाटक येथील झालेल्या निवडणुकीतही थोपटे यांचे योगदान होते. सोबत महाराष्ट्र राज्यामध्ये पक्षाची भूमिका रोखठोक बजावण्यासाठी थोपटे अग्रेसर असतात. (Bhor News) असे असताना सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत थोपटे यांचे चांगले संबंध असतानाही प्रत्येकवेळी त्यांना डावलले जात आहे. थोपटे यांचे काम काँग्रेसच्या निदर्शनास आणून देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठरावावर बोलताना शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो.
आता तुम्ही ठरवा, न्याय द्यायचा की नाही, नाहीतर आम्ही तयार आहोत सांगत, भाजप प्रवेशासाठी दरवाजे कायम उघडे असल्याचे अप्रत्यक्षपणे खुली ऑफर दिली आहे. (Bhor News) तीनवेळा डावलले गेल्यामुळे संग्राम थोपटे काय निर्णय घेणार, याकडे सर्व काँग्रेसप्रेमी व भोर, वेल्हा, मुळशीमधील त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : भोर-कापूरहोळ रस्ता दुरुस्त करा; अन्यथा युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘रास्ता रोको’