तुषार सणस
Bhor News : भोर : पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणारा सारोळा येथील नीरा नदीवरील पूल धोकादायक ठरत होता. या पुलावर आत्महत्या, घातपात, अपघात अशा घटना वाढत असल्याने, त्यावरील उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली. सुरक्षाव्यवस्था केलेली असताना देखील एकाने पुलाच्या मध्यभागी जात, तेथून उडी मारत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. निलेश महादेव काकडे (वय ४० वर्ष, रा. पुणे) यांची दुचाकी पुलावर आढळून आल्याने त्यांनी येथे आत्महत्या केल्याचा संशय बळावला आहे.
पुलावर गाडी आढळल्याने संशय बळावला!
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निलेश काकडे व त्यांच्या पत्नी यांच्यात आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात ठेवत निलेश यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेली. (Bhor News) निलेश यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आठ दिवस होऊन देखील पत्नी सापडत नसल्याने ते आपल्या मेहुण्याच्या घरी राहण्यासाठी गेले होते. तेथून पुणे येथे कंपनीत जातो, असे सांगून मंगळवारी (ता. ८) निलेश घरातून निघून गेले.
दरम्यान, निलेश घरातून निघून गेल्यानंतर घरच्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. याच दिवशी रात्री निलेश वापरत असलेली स्कूटी (क्र. एम. एच. ५० व्ही. १३४७) नीरा नदी पुलावर आढळून आली. याबाबतची माहिती नातेवाईकांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये दिली.
दरम्यान, नीरा नदी पुलावर निलेश यांची गाडी आढळून आल्याने त्यांनी येथेच आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईक व पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (Bhor News) घटनेचे गांभीर्य लक्षात घेत किकवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन शोध घेत आहेत. महाबळेश्वर ट्रेकर्स व रेस्क्यू टीम शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनास्थळी पोलीस नाईक मदने, पोलीस नाईक निंबलकर हे रेस्क्यू टीमसोबत शोध घेत आहेत.