जीवन सोनवणे
Bhor News : भोर : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाने नसरापूर बंदची हाक दिली. येथील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नसरापूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व नसरापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. नसरापूर गाव ते चेलाडी फाटा याठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने नसरापूर येथे मराठा बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा काढला.
नसरापूर येथील भैरवनाथ मंदिरापासून मराठा बांधवांनी हातामध्ये भगवा पताका व सरकारच्या निषेधाच्या घोषणांचे फलक घेऊन बाजारपेठेतून मोर्चा काढला. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा बांधवाना न्याय्य हक्क, नोकरीत आरक्षण या मुद्द्यावर आंदोलक कार्यकर्ते भूमिका मांडत आहेत.
‘या वेळी एक मराठा, लाख मराठा’, ‘निर्धार मराठा आरक्षणाचा; लढा मराठ्यांच्या एकजूटीचा…’ या घोषवाक्याने परिसर दणाणून गेला. भोर तालुक्यातील मराठा पुरुष व महिलांनी मोर्चामध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.