जीवन सोनवणे
Bhor News : भोर : नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. ८) भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती एमबीए व एमसीएचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रीया पूर्ण झालेले हे पहिले विद्यालय
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके यांनी नायगाव, नसरापूर येथे नवसह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना २०१० साली केली. संस्थेमध्ये अभियांत्रिकी पदविका व पदवी, औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी, मॅनेजमेंट, स्कूल व जुनिअर कॉलेज हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत असून, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ८) दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार असून, या वेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर व धोंडीराम पवार, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुहास पाखरे यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाचे ग्रामीण भागात असलेले पहिले विद्यालय
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एमसीए अभ्यासक्रम असलेले पाहिले विद्यालय याठिकाणी होत असून, ग्रामीण भागातील मुलांना चालना देण्याचे काम नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी करीत आहे. एमसीए अभ्यासक्रमासाठी १२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली आहे. एमबीएसाठी २०७ विद्यार्थी असून, पुणे जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रीया पूर्ण झालेले हे पहिले विद्यालय आहे.
भोर तालुक्यात येणारे प्रथम कुलगुरू
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नसरापूर नायगाव याठिकाणी नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेमध्ये प्रथमच येणारे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी हे आहेत. या भेटीमध्ये ते ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती समजून घेऊन, मार्गदर्शन करणार आहेत.