भोर, (पुणे) : मोकळ्या जागेचा फायदा घेत राजापूर गावातील काहींनी भूखंड बळकावली आणि आपली पोळी भाजून त्या जागेवर घरे बांधली. सरकारी जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी नागरिक एकत्र आले असून, निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राजापूर गाव हे 1962 साली पुनर्वसन झाले. शासनाने गावातील ग्रामस्थांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. काही जागा ही शासनाने लोकांसाठी त्यांच्या सुविधेसाठी राखीव ठेवली. जसे धर्मशाळा, सरकारी दवाखाने, जनावरे यांचे दवाखाने, शाळा, मंदिर इत्यादी राखीव ठेवून आरक्षणे टाकली. मात्र, मोकळ्या जागेचा फायदा घेत राजापूर गावातील काहींनी भूखंड बळकावली आणि आपली पोळी भाजून त्या जागेवर घरे बांधली.
सर्व शासकीय जागा शासनाने लवकरात लवकर मोकळी करावी, यासाठी राजापुर ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार भोर यांना निवेदन दिले. हे निवेदन देताना हर्षद बोबडे, विजय बोबडे, सुदाम इंदलकर, सुभाष बोबडे, नवनाथ बोबडे, योगेश बोबडे आदी उपस्थित होते. निवेदन देत लवकरात लवकर शासकीय भूखंड मोकळा करावा ही विनंती केली असून, जागा मोकळी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.