तुषार सणस
Bhor News : भोर : आर के इंडस्ट्रीज कंपनीचे गोडाऊन फोडून स्टोअर रूममधील मोटारींसह साहित्याची चोरी करणाऱ्या ४ आरोपींना राजगड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कापूरहोळ येथून शनिवारी (ता.२) पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. राजगड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
बाळासाहेब हनुमंत साळुखे (वय-३२), सुमीत विनोद शिंदे (वय-२४), भूषण विठ्ठल शिंदे (वय २८, तिघेही रा. पॉवर हाऊस, फुरसुंगी, ता. हवेली), विजय संजू म्हस्के (वय-२२, रा. बिबवेवाडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
७ लाख १६ हजारांचा ऐवज जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावात चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे राजगड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली होती. पोलिस नाईक निंबाळकर हे कापूरहोळ परिसरात गस्त घालत होते. (Bhor News) गस्त घालत असताना निंबाळकर यांना आर के इंडस्ट्रीज कंपनीच्या बाहेर अंधारामध्ये पिकअप संशयास्पद उभी असल्याची दिसली. त्यानंतर निंबाळकर यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना दिली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी उपनिरीक्षक नितीन झिंजुर्के व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले. सदर पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच, (Bhor News) चोरट्यांनी पिकअप मधून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून कापूरहोळ जवळून गाडी पकडली. मात्र गाडीतील चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.
दुसरीकडे, कंपनी मध्ये शिरलेले इतर तीन साथीदार कंपाऊंड भिंती वरून उडी मारत कापूरहोळ दिशेने पसार झाले होते. त्या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करून स्थानिक तरुण मिलिंद जगताप, रामदास जगदाळे, सागर जगताप यांच्या मदतीने पोलिसांनी कापूरहोळ जवळ अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी पिकअप मधून ६ मोटारी, कार्डिंगची मशिन पार्ट, तसेच तांब्याच्या तारा व पिकअपसह ७ लाख १६ हजारांचा ऐवज जप्त केला. (Bhor News) आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हि उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन झिंजुर्के, पोलीस अंमलदार निंबाळकर, पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, नाना मदने, योगेश राजीवडे, गणेश लडकत यांच्या पथकाने केली आहे.