Bhondvewadi Gram Panchayat Election 2023 : बारामती : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली. अनेक ठिकाणी उमेदवारांना विजयाची खात्री नाही. त्यांच्यात धाकधूक आहे. एक, एक मत महत्वाचे असल्याचे अनेक उमेदवार म्हणतात. परंतु निकाल हाती येण्यास काही तासांचा अवधी बाकी असतानाच बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाल उधळतच मतदान केंद्रावर दाखल झाले. विजयाची खात्री असल्याचे सांगत, जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निकालापूर्वीच विजयोत्सव साजरा केला.
बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी दहा वाजता मोजणीला सुरवात झाली. तालुक्यातील ३२ पैकी ३१ ग्राम पंचायतींचा निकाल आज हाती येणार आहे. येथील १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या तालुक्यात एकूण ८५ टक्क्यांच्या वर मतदान झाले आहे. त्यामळे निकालात चुरस पहायला मिळणार आहे.
अजित पवार यांच्या काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आहे. परंतु आता राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपने अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप-प्रत्यारोप दोन्ही गटाकडून झाला. परंतु सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच अंगावर गुलाल टाकत आलेले भोंडवे ग्रामपंचायतीचे सदस्य, हा मतमोजणी केंद्रावर चर्चेचा विषय ठरला. या ग्रामपंचायतीत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत आहे.