अरुण भोई
मलठण : मलठण (ता. दौंड) येथे रविवारी ओपन मैदान आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. दौंड तालुका तसेच परिसरातील बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य घनश्याम देवकाते, स्वामी चिंचोलीचे सरपंच अझरुद्दीन शेख, वाटलुजचे सरपंच युवराज शेंडगे, मलठण येथील युवक कार्यकर्ते अमर परदेशी, राजेगाव येथील गटनेते मुकेश गुणवरे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दौंड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची मोठी बैलगाडा शर्यत रंगणार असल्याने याची जोरदार तयारी मलठण- स्वामी चिंचोली गावच्या शिवारात चालू होती. जिल्ह्यातील व परिसरातील सर्व बैलगाडा मालक व चालकांना शर्यतीसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी काही नियम व अटी लागू होत्या. सर्व गट पास होणाऱ्या गाड्यांसाठी आकर्षक चषक व सेमी फायनलसाठी पात्र होणाऱ्या सर्व गाड्यांसाठी टी-शर्ट देण्यात आले. बक्षीस विजेत्या बैलगाडा मालकाला प्रथम क्रमांकासाठी ७१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार, तृतीय क्रमांकासाठी ३१ हजार, चतुर्थ क्रमांकासाठी २१ हजार, पाचव्या क्रमांकासाठी ११ हजार व सहाव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपये अशी रक्कम रोख स्वरूपात ठेवली होती.
या स्पर्धेमधील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
– प्रथम क्रमांक : माणिक बापू वाघमोडे – ७१ हजार (माळशिरस)
– द्वितीय क्रमांक : सरपंच राजकुमार भाऊ भोसले, ५१ हजार (जंक्शन)
– तृतीय क्रमांक : आडवलनाथ, ३१ हजार (धांगवडी केंजळ)
– चतुर्थ क्रमांक : जय हनुमान प्रसन्न, २१ हजार (शिवम शिंदे)
– पाचवा क्रमांक : आई तुळजाभवानी, ११ हजार (बळीराम अप्पा रोखळे, वडगाव)
– सहावा क्रमांक : सोमेश्वर, ७ हजार (सचिन कल्याण)
– सातवा क्रमांक : सांगोबा, ५ हजार (तामखडा, बारामती)
– आठवा क्रमांक : अविष्कार कटके, ३ हजार (सणसर)
सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक मिळाले. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली वितरण झाले. या वेळी सर्व सहकारी उपस्थित होते.