Pune News : भिगवण : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती विशेष अनुदानातून भिगवण स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, शाळा दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
या निधीमधून विद्यार्थ्यांसाठी शाळेत शैक्षणिक वातावरण तयार करून, शाळा अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा देखील बसविली जाणार आहे.
या वेळी बोलताना सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी शाळेच्या भौतिक सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरण निर्मिती होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते.
भूमिपूजनप्रसंगी सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, संजय देहाडे, अभिमन्यू खटके, रामहरी चोपडे, सईबाई खडके, जुलेखा शेख, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, गुराप्पा पवार, पिंटू शिंदे, सागर पांढरे, सुरेश बिबे, अॅड. सूरज खटके, राहुल चोपडे, भारत गायकवाड, राहुल लंबाते, राहुल गुणवरे, शाळा समितीचे सदस्य, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऑनलाईन ओपन टेंडर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मंजूर झालेल्या या कामाची निविदा ऑनलाईन ओपन टेंडर पद्धतीने करण्यात आली. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २० लाख ९ हजार ७४४ रुपये असून, हे काम ठेकेदाराने २५.८० टक्के कमी दराने घेतले असून, या कामातून ५ लाख ६८ हजार ५९६ रुपयांची बचत झाली आहे.