सागर जगदाळे

भिगवण : भिगवण-राशीन रस्त्याखालील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण भिगवण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी वाहताना दिसले आणि पाईप फुटल्याचे स्पष्ट झाले. मात्र, रस्त्याखाली तब्बल २० फूट खोल गेलेली पाईपलाईन दुरुस्त करणे आता अवघड ठरत आहे.

सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असले तरी, किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. दरम्यान, भिगवण-राशीन रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने नवीन पाईपलाईन बसवण्याची लेखी हमी दिली होती. मात्र, काम अर्धवटच सोडून ठेकेदाराने जबाबदारी झटकली, आणि ग्रामपंचायतीनेही त्याकडे कानाडोळा केला. त्याचा फटका आता थेट ग्रामस्थांना बसत आहे.

ग्रामपंचायतीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असले तरी, गावात पाण्यासाठी हाकाहाकी सुरू झाली आहे. “जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणी द्या,” अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांचा ठेकेदार आणि ग्रामपंचायतीबद्दलचा रोष उफाळून आला आहे. “वेळीच ठेकेदारावर कारवाई केली असती आणि पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेतले असते, तर आज पाण्यासाठी अशी धावपळ झाली नसती. ठेकेदारांना पाठीशी घालूनच ही वेळ आली,” असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करून काम सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांत काम पूर्ण होईल. मात्र, गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही.”
-दत्तात्रय परदेशी, ग्रामपंचायत अधिकारी, भिगवण







