सागर जगदाळे
Bhigwan News | भिगवण, (पुणे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने समता फाउंडेशन भिगवन च्या वतीने “वाचू संविधान दहा तास” ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आलेली असून पंधरा वर्षे वयाच्या पुढे खुला गट व पंधरा वर्षे वयाच्या आतील लहान गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.
रविवार (ता. १४) सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कला महाविद्यालय भिगवन येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धकांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आपली उत्तरे लिहिता येतील. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने नाव नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी १०० रूपये नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली आहे.
सुधीर भोसले ९७३०५१५२०२ या क्रमांकावर पैसे पाठवून त्याचा स्क्रीन शॉट व स्पर्धकाचे नाव याच व्हाट्सअप क्रमांकावर पाठवून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता या स्पर्धेसाठी रविवारी सकाळी सात वाजता स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांना हजर राहावे लागेल. सकाळचा चहा, नाश्ता व दुपारचे जेवण स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने मोफत दिले जाणार आहे. फक्त स्पर्धकांनी येताना स्वतःची संविधानाची प्रत सोबत घेऊन यायचे आहे.
स्पर्धकांना सकाळी स्पर्धेदिवशी सकाळी आठ वाजता स्पर्धेतील ठराविक अभ्यासक्रम दिला जाईल व त्यावर संध्याकाळी साडेपाच वाजता मल्टिपल चॉइस क्वेश्चन या पद्धतीने उत्तरे नोंदवायची आहेत. या स्पर्धेमध्ये परीक्षेतील गुणांसोबतच शिस्तीसाठी शंभर गुण दिले जाणार आहेत. ब्रेक नंतर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गुण कमी केला जाणार असून स्पर्धेमध्ये प्रत्येक तासात बोलणाऱ्या, झोपणाऱ्या, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गुण कमी केला जाईल.
https://forms.gle/92kt71vwQCebTzVRA
स्पर्धेमध्ये मोबाईल आणू नये व आणल्यास आणि तो वाजल्यास त्याचे पाच गुण वजा केले जातील. अशी माहिती संयोजन समितीने दिलेली आहे दिनांक १० मे २०२३ पर्यंत सहभागी होण्यासाठी अंतिम नोंदणी करू शकता. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आला. मोठ्या गटामध्ये स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय पारितोषिक ७ हजार, तृतीय ५ हजार व १० उत्तेजनार्थ पारितोषिके व सन्मानचिन्ह दिली जाणार आहेत.
दरम्यान, लहान गटांमध्ये ७ हजार, ५ हजार, ३ हजार व ७ उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी ७०० रुपये प्रमाणे देण्यात येणार आहेत. नाविन्यपूर्ण स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी अशी विनंती समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय देहाडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.