भिगवण,ता. 17: भिगवण ग्रामपंचायतीने चालू आर्थिक वर्ष संपत आले तरीही अपंग कल्याण निधीचे वाटप न केल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत शनिवार दि 15 रोजी निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून सरपंच गुराप्पा पवार यांनी त्याची दखल घेत अपंग बांधवांना निधी वाटप करण्यात येणार असून, नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ज्यांनी या पूर्वीच नोंदणी केलेली आहे. त्यांच्या निधी वाटपाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ग्रा.प. प्रशासनाने निधी वाटपाबाबत वेळ काढूपणा करून गाजर दाखवण्याचे काम केले की काय ? असा प्रश्न या बांधवांना पडला आहे.
वास्तविक पाहता, ग्रामपंचायतने आवाहन करताना अपंग कल्याण निधी वाटपाची निश्चित तारीख व वेळ कळविणे गरजेचे असताना असा कोणताही उल्लेख त्यात केलेला दिसत नाही. त्यामुळे निधीचे वाटप कधी होईल याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.
ग्रामपंचायतीची आर्थिक दुर्दशा झालेली आहे, निधी वाटपाबाबत कोणतीही निर्णायक भूमिका घेतली जात नाही. येत्या 8 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहोत.
– किशोर पोंदकुले (ग्रामस्थ भिगवण)