भिगवण : येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांचे बंगळुर येथील राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषदेच्या वतीने नुकतेच मुल्यांकन करण्यात आले. मुल्यांकनामध्ये महाविद्यालयांने ब+ ही श्रेणी मिळविली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे बंगळुर येथील राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषदेच्या वतीने 29 व 30 ऑगस्ट रोजी मुल्यांकन करण्यात आले, याबद्दल नुकतीच घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेश येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरविंदकुमार दिक्षीत, छत्तीसगड येथील गुरु घासीदास विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीणकुमार मिश्रा व हरियाणा येथील वाय.एम.सी.ए. विद्यापीठातील प्रा. डॉ. संदीप ग्रोव्हर यांचा समावेश असलेल्या समितीने महाविद्यालयास नुकतीच भेट देऊन मुल्यांकन केले होते.
समितीने महाविद्यालयातील भौतिक सुविधा, शैक्षणिक कार्य, शिक्षणेत्तर उपक्रमक आदी बाबींची तपासणी केली होती. संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही पातळीवरील मुल्यांकनात महाविद्यालयाने ब+ श्रेणी (बी.प्लस) प्राप्त केली आहे. सदर मुल्यांकनासाठी प्रा. डॉ. महादेव वाळुंज, समन्वयक डॉ. प्रशांत चवरे, सहसमन्वयक प्रा. पद्माकर गाडेकर व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पराग जाधव, रणजित भोंगळे, संपत बंडगर, सुनिल वाघ, माजी विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षामध्ये केलेल्या कार्याची नॅक समितीने दखल घेत ब+ ही श्रेणी प्रदान केली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने मिळविलेल्या या यशाद्दल सर्व घटकांचे अभिनंदन केले.