Bhigavan News : भिगवण, ता.१२ : २२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशू स्पर्धेत भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी तुषार मोहिते हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वैष्णवीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे दौंड व इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.
५६ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक
२२ वी राष्ट्रीय ज्युनिअर वुशू स्पर्धा ऑल इंडिया वुशू फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा पटना (बिहार) येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता अकरावीच्या विज्ञात शाखेत शिकत असलेली विद्यार्थिनी वैष्णवी मोहिते हिने सहभाग घेतला होता. वैष्णवीने ५६ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. यासाठी तिला क्रीडाशिक्षक प्रदीप शिवपुजे यांचे मार्गदर्शन मिळाले. Bhigavan News
दरम्यान, वैष्णवीने मिळविलेल्या यशाचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर, प्राचार्या नंदा ताटे, प्राचार्या सिंधू यादव यांनी भरभरून कौतुक केले. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबत बोलताना वैष्णवी म्हणाली कि, भिगवण सारख्या ग्रामीण भागातील असूनसुद्धा, माझ्या आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता वुशू खेळण्यासाठी संधी देऊन नेहमी प्रोत्साहन दिले आहे. खरतर हि स्पर्धा खूप खडतर आहे. मात्र मी या स्पर्धेत लढत देऊन तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. तसेच क्रीडाशिक्षक प्रदीप शिवपुजे यांनी योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. Bhigavan News