Bhigavan News : भिगवण, (पुणे) : भिगवण ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात वराहपालन केले जात आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वराहपालनामुळे निघणाऱ्या मलयुक्त घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ०७) बंदिस्त वराह पालनांच्या विरोधात नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
भिगवण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डुकरांचा त्रास हा सामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता. त्याविरुद्ध भिगवण ग्रामपंचायतिने कठोर पावले उचलत डुकरे पकडण्याचं टेंडर काढलं होतं. त्यावरून भिगवण ग्रामपंचायत मध्ये वराह पालक व विद्यामान सत्ताधारी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झालेली होती. पण आता मोकाट डुकरांच्या त्रासानंतर बंदिस्त वराह पालनाचा त्रास हा लक्ष्मी नगर मधील नागरिकांना होत आहे. Bhigavan News
बंदिस्त वराहपालना करीत असताना कुठल्याही प्रकारची स्वच्छता ठेवली जात नाही. भिगवण व भिगवण परिसरातील हॉटेल ढाबे यांच्याकडून मांसाहारी व शाकाहारी विटलेले उष्टे व खरकटे अन्न या बंदिस्त वराहांना टाकले जाते. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या या अन्नाचा वास हा परिसरामध्ये पसरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना श्वास घेण्यासाठी मुश्कील झाले आहे. विशेषतः लहान मुलांना याचा जास्त त्रास होत असून यावरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी लक्ष्मी नगर मधील नागरिकांनी केली आहे. Bhigavan News
शासकीय जागेत अतिक्रमण करून केले बंदिस्त वराहपालन..
लक्ष्मीनगर या ठिकाणी करण्यात आलेले वराहपालन हे बेकायदेशीरपणे शासकीय जागेत केले असून सदर वराहपालन करणारे मालक यांनी कुठल्याही प्रकारचा परवाना घेतला नसून ग्रामपंचायतच्या शासकीय दप्तरी कोणतीही नोंद नाही.ज्या ठिकाणी हे वराहपालन केले त्या ठिकाणी काही मोकाट डुकरे सुद्धा आहेत. जवळच शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात ही डुकरे घुसतात व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गांला या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून व्यवसाय करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचाही त्वरित बंदोबस्त करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. Bhigavan News
स्व.रमेश(बापू) जाधव यांची काढली आठवण..
सदर उपोषणास्थळी वराह पालनाच्या दुर्गंधीमुळे होत असलेल्या असहाय्य त्रासामुळे आपली खंत व्यक्त करताना केशरबाई पवार यांनी स्व.रमेश जाधव यांची आठवण काढताना म्हणाल्या की जर रमेश (बापू) जाधव आज असते तर ही वेळच आज आली नसती. वेळीच ह्या गोष्टीचा त्यांनी बंदोबस्त केला असता आणि होणाऱ्या त्रासातून समस्त कुंचिकोरवे समाजाची व परिसरातील नागरिकांची सुटका केली असती.
ग्रामपंचायतीला निवेदन..
सदर बेकायदेशीर वराह पालना विरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंडाळे यांनी भिगवण ग्रामपंचायत यांना रीतसर निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनानुसार लक्ष्मीनगर (कुंचीकोरवे समाज नगर) (वार्ड क्र.४) भिगवण येथे कोंडावड्यात सुरू वराहांना दररोज हॉटेलमधील खरकटे, विटलेले अन्न, इत्यादी खाद्य दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीनगर मध्ये खुप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. या दुर्गंधीमुळे व राड्यारूड्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रोगराई जास्त पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी नगर मधील नागरिकांना या बंदिस्त वराह पालनांच्या दुर्गंधीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. तरी सदर बेकायदेशीर बंदीस्त वराह पालन त्वरीत बंद करावे. यासाठी सोमवारपासून भिगवण ग्रामपंचायत समोर संदिप यलाप्पा गुंडाळे व लक्ष्मीनगर मधील दुर्गंधीने त्रस्त असणारे नागरिक सामुहीक उपोषणास बसले आहेत. Bhigavan News
याबाबत बोलताना सरपंच दीपिका क्षीरसागर म्हणाल्या, “वराह पालनामुळे दुर्गंधी पसरत असून याबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. सदर वराहपालन करणाऱ्या मालकांना ग्रामपंचायतमार्फत रीतसर नोटीस बजावली आहे व त्याबाबत उपाययोजना करण्यास सांगितले आहे. लक्ष्मी नगर मधील कुठल्याही वराह पालनाची नोंद ही ग्रामपंचायत दप्तरी नाही. भिगवण ग्रामपंचायत ही कोणाच्याही व्यवसायाविरोधात नसून पण प्रत्येक व्यवसायिकाने आपल्या व्यवसायाचा इतरांना त्रास होणार नाही याची पण खबरदारी घेणे गरजेचे आहे. भिगवण ग्रामपंचायतच्या जागेत अतिक्रमण करून वैयक्तिक मालकीचे वराहपालन कोणालाही करता येणार नाही याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा बेकायदेशीरपणे शासकीय जागेत वराह पालन करणाऱ्या मालकांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल.”