Bhide Wada National Monument : पुणे : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने क्रांतिकारक पाऊल उचलून देशातील पुण्यातील भिडे वाड्यात सर्वप्रथम मुलींची शाळा सुरु करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तो भिडे वाडा आता राष्ट्रीय स्मारक होणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अगदी समोरच हा भिडे वाडा आहे. तात्यासाहेब भिडे यांनी शाळेसाठी फुले दाम्पत्याला जागा दिली आणि १ जानेवारी १८४८ रोजी तेथे मुलींच्या पहिल्या शाळेचा श्रीगणेशा झाला आणि सावित्रीच्या लेकींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. ही वास्तू म्हणजे पुणेकरांसाठी श्रद्धास्थान आहे.
ज्या वास्तूत ही शाळा सुरू झाली तो भिडे वाडाच कायम दुर्लक्षित राहिला. ही वास्तू विस्मृतीत गेल्याने या शाळेची ओळख जवळपास पुसली गेली. बुधवार पेठेतील गजबजलेल्या ठिकाणी हा भिडे वाडा उभा आहे. वाड्याच्या समोरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि डाव्या बाजूला दत्त मंदिर आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर फुलं विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांनी वेढलेला आहे. मात्र, मुलींची पहिली शाळा कुठे आहे? असे विचारले तर कुणालाच सांगता येणार नाही अशी स्थिती आहे.
काही वर्षांपूर्वीच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले; पण सावित्रीच्या लेकींनाच भिडे वाडा कुठे आहे याची माहिती नाही. मात्र, भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने आता जुन्या ऐतिहासिक स्मृतींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. मुलींची शाळा सुरु करण्यासाठी फुले दाम्पत्याने अनेक दगड-धोंडे सोसले. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.
दरम्यान, आजची भिडे वाड्याची स्थिती पाहिली तर या शाळेचा इतिहासाच जणू पुसला गेल्याची जाणीव होते. पण सर्वोच्च न्यायालयाने जागेचा वाद सोडविला आणि राष्ट्रीय स्मारकाचा अडथळा दूर झाला. आता भिडे वाड्याची ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहणार आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.