इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२४-२५ च्या उस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा हप्ता प्रति टन रु. २८०० प्रमाणे जाहीर केला असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जात आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये आज अखेर १.५ लाख मे. टन ऊस गाळप पुर्ण केले आहे. या गळीत हंगामामध्ये १५ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊस बिलाची रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
निरा भिमा कारखान्याकडून चालु हंगामामध्ये गाळप होणाऱ्या उसाची बिले नियमितपणे शेतकऱ्यांनां अदा केली जाणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी कारखान्यास गळीतास जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळाने केले आहे. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, प्रकाश मोहिते, मच्छिद्र वीर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील आदी उपस्थित होते.