पुणे : किरकोळ कारणावरून शिवीगाळ, बेदम मारहाण, खून अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. असाच प्रकार बालेवाडी परिसरात घडला आहे. आपल्या बहिणीला भावोजी त्रास देत असल्याने भाऊ संतप्त झाला. भावोजीच्या वाढत्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय भावाने मित्राच्या मदतीने भावोजीलाच संपवण्याचा कट रचला. गुरूवारी (ता. २१) पहाटे दोघांनी मिळून भावोजीला बेदम मारहाण करून हत्या केली. हत्येनंतर दोघेही आरोपी पसार झाले. या घटनेमुळे बालेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी १८ वर्षीय तरुणाने फिर्याद दिल्यानुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बाब्या व राहुल रिकामे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा भावोजी मृत राजेंद्र कांबळे हा पुण्यातील बालेवाडी येथील पाटील वस्ती येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तो काही महिन्यांपूर्वीच पुण्यात आला होता. बिगारी काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. राजेंद्र कांबळे हा पत्नीला वारंवार मारहाण, शिवीगाळ करत होता. एवढेच नव्हे तर तिला प्रचंड मानसिक त्रास देत होता. आपल्या बहिणीला होणारा त्रास आरोपीला असह्य झाला होता. यातूनच त्याने मित्राच्या मदतीने भावोजीला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी राजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी पसार आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.